असे म्हणतात की आपल्या आयुष्यात मित्र-मैत्रिणींचा सहवास असावा, तसाच आपल्या माणसांचाही. जिथे जन्म आहे, तिथे मरण अटळ आहे. आपण या जगात येतो तेव्हा रिकाम्या हातांनी, पण जाताना मात्र असंख्य आठवणी, आशीर्वाद आणि प्रेम घेऊन जातो. खरं तर मला असं वाटतं की आपण आठवणीच देऊन जातो—आणि त्यापेक्षा अनमोल असं काहीच नसतं.
असाच माझा दोस्त—आपले विचार, आपले ज्ञान आणि आपली माणुसकी आम्हा सर्वांना देऊन अनंतात विलीन झाला. माझा दोस्त म्हणजे माझे छोटे काका. आमचे सर्वांचे लाडके काका.
मी काकांना लहानपणापासून पाहत आले आहे. सुरुवातीला ते मला खूप शिस्तप्रिय, थोडे रागीट वाटायचे. त्यांच्याशी बोलायलाही मी घाबरायचे. पण बाबा काकांच्या लहानपणीच्या गोष्टी सांगायचे, तेव्हा हळूहळू लक्षात आलं—काका तर अतिशय साधे, सरळ आणि मनाने स्वच्छ होते.
जशी मी मोठी होत गेले, तसं आमचं नातं नात्यापेक्षा मैत्रीकडे झुकत गेलं. आम्ही कोणत्याही विषयावर मोकळेपणाने बोलायचो. आमच्या चर्चा तासन्तास चालायच्या. मला त्यांची एक गोष्ट विशेष भावायची—एखाद्या विषयाची माहिती नसेल, तर ते कधीही चुकीची माहिती देत नसत. “मला खरंच माहित नाही,” असं प्रामाणिकपणे सांगायचे आणि नंतर शोधून नक्की उत्तर द्यायचे.
काका घरातल्या असोत वा बाहेरच्या—प्रत्येकाशी ते सरळ, साधेपणाने बोलायचे. कोणालाही अपशब्द वापरणं तर दूरच; उलट उत्तरही देत नसत. समोरच्याला समजून घेण्याचा त्यांचा स्वभाव होता. मनापासून मदत करायचे आणि मदत केल्याची जाहीर वाच्यता कधीच करत नसत. अहंकाराला त्यांच्या आयुष्यात स्थान नव्हतं.
काकांनी आम्हाला खूप काही शिकवून ठेवलं. ते बिनधास्त, मनमोकळे होते. कितीही ताण असला, तरी त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू कधीही कमी झालं नाही.
काकांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. त्यांना पाहिलं की मला श्रीकृष्णाचा चेहरा आठवायचा—जसा जुन्या मालिकांमध्ये दाखवायचे, अगदी तसाच. जसं झाडाचं जगणं मुळांवर अवलंबून असतं, तसं आमचं कुटुंब काकांच्या अस्तित्वामुळे एकत्र होतं—आणि आजही आहे.
घरात त्यांना फार मान होता. आमच्या कुटुंबाचा कर्ता-धर्ता पुरुष म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. मी नेहमी म्हणायचे, आम्ही जरी झाडाच्या पानांसारखे असलो, तरी काका आमच्या कुटुंबरूपी झाडाचं मूळ होते—आहेत आणि कायम राहतील.
काकांनी कुटुंबासाठी खूप काही केलं, ते आम्ही प्रत्यक्ष पाहिलं आहे. शरीराने ते मुंबईत असायचे, पण मन मात्र कायम गावाकडे धाव घेत असे. गावासाठी शाळा, हॉस्पिटल अशा सुविधा उभ्या करण्याचं त्यांचं स्वप्न होतं. गावासाठी, घरासाठी त्यांनी मोठी स्वप्न पाहिली होती.
काका जुन्या विचारांचे होते, पण आधुनिकतेलाही त्यांनी मान दिला होता. त्यांचा अध्यात्मावर विश्वास होता, तसाच विज्ञानावरही. घरातल्या लहानथोरांना ते जुन्या काळाच्या गोष्टी सांगायचे. गावाच्या आठवणी निघाल्या की, तासन्तास त्यांच्या गोष्टी रंगायच्या.
काका नेहमी चांगल्या गोष्टींना साथ द्यायचे आणि त्याचं मनापासून कौतुकही करायचे. माझ्या या दोस्ताबद्दल—माझ्या काकांबद्दल—अजून खूप काही लिहिता येईल. एक-दोन पुस्तकेही होतील.
पण शेवटी एकच सांगते—काकांनी मला मोकळेपणाने बोलायला शिकवलं. आज माझ्यात जी हिम्मत आणि स्पष्टपणा आहे, तो त्यांच्यामुळेच. म्हणूनच आज मी त्यांच्याबद्दल लिहू शकले.
किस्स्यांपेक्षा मला त्यांच्या स्वभावाबद्दल, त्यांच्या वागणुकीबद्दल लिहावंसं वाटलं.
काका, तुम्हाला मानाचा मुजरा.
तुम्ही या जगात नसाल, पण माझ्यासाठी तुम्ही कायम माझ्यासोबत आहात—आणि राहाल.
No comments:
Post a Comment